| माथेरान | प्रतिनिधी |
युद्धसदृश परिस्थितीमुळे देशभरात गॅस व इंधन टंचाईची झळ बसत असताना माथेरानमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, तसेच स्टॉलधारक व्यावसायिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर माथेरानचे नगरसेवक तथा विरोधीपक्ष गटनेते सिताराम कुंभार, नगरसेवक सचिन दाभेकर, किरण पेमारे, नगरसेविका अनिता रांजाणे व अनुसया ढेबे यांनी तहसील प्रशासनाकडे पत्र देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. तहसील अधीक्षक सुरेंद्र सिंग ठाकूर यांनी या मागणीची तातडीने दखल घेत परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक आदेश दिले. त्यानुसार माथेरानमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने सर्व व्यावसायिकांना गॅस उपलब्ध करून दिला जाणार आहे.







