पनवेल रेल्वे स्थानकात गॅस टँकरला गळती

| पनवेल | प्रतिनिधी।

पनवेल रेल्वे स्थानकात शनिवारी (दि. 15) रात्री जेएनपीटीहून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू रेल्वेवरील एचपीसीएलच्या गॅस टँकरला अचानक गळती लागल्याची घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर मालगाडी आल्यानंतर ही गळती निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पनवेल अग्निशमन दल आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याने मोठी दुर्घटना टळली.

गॅस गळतीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक पाच तातडीने रिकामा करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पनवेल स्थानकातून डाऊन दिशेने जाणाऱ्या दोन तसेच अन्य दोन गाड्या स्थानकाबाहेरच थांबविण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आवश्यक खबरदारी घेतली, तर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षित अंतरावर ठेवत परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली. दरम्यान, एचपीसीएलच्या तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. तज्ज्ञांनी तातडीने उपाययोजना करत गॅस टँकरमधील गळतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. त्यानंतर रात्री सुमारे पावणेबाराच्या सुमारास मालगाडीला डिझेल इंजिन जोडून कळंबोली स्थानकाच्या दिशेने रवाना करण्यात आले. तेथे मालगाडी थांबवून टँकरच्या गळतीच्या दुरुस्तीचे अंतिम काम हाती घेण्यात आले. या घटनेमुळे काही काळ रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. मात्र, वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या घटनेचा लोकल रेल्वे मार्गावर कोणताही परिणाम झाला नसून पनवेलहून धावणारी लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Exit mobile version