। पुणे । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झाल्याची दुर्घटना घडली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. त्यामुळे अनेक प्रवासी व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ चर्चच्या बाजूला रविवारी (दि. 24) सकाळच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाला. हा टँकर मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना अचानक तोल गेल्याने टँकर पलटी झाला. या अपघातामुळे मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गॅस टँकरमधून गळती होण्याचा धोका असल्यामुळे सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघातस्थळी विशेष टीम पाठवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, वारजे पुलाजवळून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.