। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा काल दि.23 जुन रोजी संपन्न झाली. सभेत कचरा, पाणी आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेस उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी सुरेखा भणगे, गटनेते नितीन सावंत, विरोधी पक्षनेते शरद लाड, विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, प्राची डेरवणकर,सुवर्णा निलधे, ज्योती मेंगाळ, वैशाली मोरे, भारती पालकर, संचिता पाटील, नगरसेवक राहुल डाळींबकर, बळवंत घुमरे, विवेक दांडेकर,सोमनाथ ठोंबरे उपस्थित होते.सभा संपण्याच्या अगोदर राष्ट्रवादीचे नगरसेवक उमेश गायकवाड यांनी हजेरी लावली.
मागील सभेचे कार्यवृत्त कायम करणे हा पहिलाच विषय समोर आल्यावर राहुल डाळींबकर यांनी मागील सभेत ठरल्या प्रमाणे स्वच्छता व पाणी पुरवठा याविषयांवर विशेष सभा घेणार असे सांगितले होते मात्र ती अद्याप झाली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले त्यावर मागील सभेत स्वच्छते बाबत सभागृहात सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या त्याबाबत संबंधीत ठेकेदार, कर्मचारी यांची बैठक घेवून त्यांना त्या संबधि सूचना दिल्या होत्या आता सफाई कर्मचार्यांचे काम समाधानी आहे असे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सभागृहात सांगितले.