घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध; उद्धव ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकला

। उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींची निवडणुक होत आहे. त्यातील घारापुरी ग्रामपंचायतमधील 7 जागा व सरपंच पद असे एकूण 8 जागांसाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याने घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. माजी सरपंच बळीराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने शिवसैनिकांनी जल्लोष केला. उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी भाजपचे असतानाही घारापुरी ग्रामपंचायतमध्ये भाजपाला एकही उमेदवार मिळू शकला नाही. त्यामुळे भाजपवर नामुष्की ओढावली आहे.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, माजी सभापती विश्‍वास म्हात्रे, माजी शहरप्रमुख महेंद्र पाटील, माजी विभागप्रमुख कमलाकर पाटील व इतर पदाधिकार्‍यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

उरणमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेने घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध करून विजयी खाते उघडल्याने शिवसेनेसाठी पायगुण चांगला असून हा मेसेज राज्यात जाईल, असा विश्‍वास नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा अभिनंदन करताना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केला. तसेच माजी सरपंच बळीराम ठाकूर व त्यांच्या टीमने केलेल्या विकासकामामुळेच भाजप तसेच शिंदे गटाला उमेदवार सापडले नाहीत. त्यामुळे घारापुरी हे जागतिक कीर्तीचे बेट असल्याने हा विजय शिवसेनेला तालुक्यात नव्हे तर राज्यात उभारी देणारे ठरेल, असे भोईर यांनी सांगितले.

घारापुरी ग्रामपंचायतमधील सदस्यांसाठी 7 जागांसाठी 7 तर सरपंचपदासाठी 1 असे एकूण 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. घारापुरी ग्रामपंचायतमध्ये विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे घारापुरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांमुळे विरोधक हतबल झाले आहेत. आपला शिवसेना उमेदवारांपुढे निभाव लागणार नसल्याने भाजपाकडून कोणी उमेदवारी अर्ज भरण्यास तयार झाला नाही. घारापुरी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बिनविरोध करून एकप्रकारे आम्ही केलेल्या विकासकामांवर शिक्कामोर्तब केला असल्याचे माजी सरपंच बळीराम ठाकूर यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सांगितले.

ग्रामपंचायत घारापुरी सार्वत्रिक निवडणूक 2022
थेट सरपंच उमेदवार महिला आरक्षण मीना मुकेश भोईर, प्रभाग क्रमांक 1 – बळीराम पद्माकर ठाकुर, हेमाली रुपेश म्हात्रे, अरुणा कमलाकर घरत, प्रभाग क्रमांक 2 – भरत शंकर पाटील, नीता दिनेश ठाकुर, प्रभाग क्रमांक 3 – सचिन मुकुंद लाड, भारती प्रमोद पांचाळ हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

Exit mobile version