घरकुल योजनाधारक अनुदानापासून अद्यापही वंचित
| तळा | वार्ताहर |
तळा शहरात घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांना वर्षभरानंतरही अनुदानापासून वंचित राहावे लागत असल्याने नव्याने घरकुल योजनेचा लाभ घ्यायचं म्हटलं तर घरकुल योजना नको रे बाबा, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे.
शासनाकडून घरकुल योजना लाभार्थ्यांना एकूण दोन लाख पन्नास हजार एवढे अनुदान देण्यात येत असून, हे अनुदान एकूण चार टप्प्यांत लाभार्थ्यांना दिले जाते. ज्यामध्ये पहिला हप्ता एक लाख, दुसरा हप्ता साठ हजार, तिसरा हप्ता पन्नास हजार व शेवटी चौथा हप्ता चाळीस हजार असे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये लाभार्थ्यांना मिळतात.
तळा शहरात एकूण 31 नागरिकांनी घरकुल योजनेत सहभाग घेतला आहे. या सर्व लाभार्थ्यांना केवळ दोनच हप्ते प्राप्त झाले आहेत. उर्वरित दोन हप्ते म्हणजे नव्वद हजार रुपये अनुदान वर्ष होत आले असतानादेखील त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाहीत. योजनेचे पैसे मिळतील या आशेने काही नागरिकांनी काडवड करून आपली घरे पूर्ण केली आहेत, तर अनुदान मिळालेले नाही म्हणून बहुतांश नागरिकांच्या घराचे काम अपूर्ण राहिले आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडून निधी आला नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यामुळे घरकुल योजना लाभार्थ्यांची चांगलीच अडचण निर्माण झाली असून, सर्वच लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळेच ज्या नागरिकांना नवीन घर बांधायचे आहेत, ते नागरिक आता घरकुल योजना नको रे बाबा असे बोलताना पाहायला मिळत आहेत.