| उरण | वार्ताहर |
जगप्रसिद्ध घारापुरी बेटाच्या किनाऱ्यावर मंगळवारी 30 फूट लांबीचा संरक्षित प्रजातीचा मृत ‘ब्लू व्हेल’ जातीचा मासा आढळून आला असून, वनविभागाने या माशाची नोंद करून स्थानिक बोटीच्या साह्याने मुंबई बेलापूर समुद्र प्रवाहात सोडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एम. कोकरे यांनी दिली. या घटनेनंतर पुन्हा एकदा समुद्रातील वाढत्या प्रदूषण आणि महाकाय जहाजाच्या वाहतुकीचा समुद्री जीवांवर होणारा परिणाम ऐरणीवर आला आहे. कारण यापूर्वी उरण अलिबाग व मुरुड येथील किनाऱ्यावर अशाच प्रकारचे मृत मासे आढळले आहेत.
मंगळवारी सायंकाळी घारापुरी बेटाच्या प्रवासी जेट्टीच्या बाजूला एक महाकाय मासा मृत असल्याचे आढळून आले असता, घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी याची माहिती पोलीस ठाणे तसेच वन विभागाला दिली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एम. कोकरे यांनी माशाची पाहणी करून हा मासा ‘ब्लू व्हेल’ प्रजातीमधील असून, त्याची लांबी तीस फूट, तर वजन सात ते आठ टन असल्याचे सांगितले. ब्लू व्हेल या माशाची प्रजाती ही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने ही प्रजाती जागतिक स्तरावर संरक्षित आहे. घारापुरी येथे आढळलेल्या माशाला वनविभागाने जाळून किंवा पुरून विल्हेवाट न लावताच पुन्हा समुद्राच्या प्रवास सोडून दिल्याने मात्र येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.