मुलींना मिळणार गरम पाणी

आदिवासी वसतिगृहासाठी व्यवस्था
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथे शासनाच्या आदिवासी विकास विभागाने बांधलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात निवासी शिक्षण घेणार्‍या मुलींना सकाळी आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था नाही. गरम पाण्याची व्यवस्था करणारी सोलर पॅनल बंद अवस्थेत आहेत, त्यामुळे त्या मुलींसाठी आदिवासी ठाकूर कातकरी समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाणी गरम करणारे विजेवर चालणारे गिझर भेट दिले आहेत.

येथे कर्जत तालुक्यासाठी असलेल्या या वसतिगृहात अन्य जिल्ह्यातीलदेखील मुली निवासी शिक्षण घेत आहेत. सध्या त्या ठिकाणी 47 मुली वसतिगृहाचा वापर करीत असून, त्यांच्या देखभालीसाठी तेथे आदिवासी विकास विभागाचे अधीक्षक तसेच जेवण बनविणारी मंडळी तसेच सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. त्या ठिकाणी राहून शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाणार्‍या मुलींना सध्याच्या सुरु असलेल्या थंडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. त्या आदिवासी मुलींसाठी शासनाने बांधलेल्या इमारतीवर पाणी गरम करणारे सोलर पॅनल बसविले आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून ती सोलर यंत्रणा बंद असल्याने मुलींना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे.

या प्रकाराबद्दल पेण येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयानेदेखील तात्काळ अभियंता पाठवून तेथील पॅनलची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सोलर पॅनल दुरुस्त झाला नाही आणि त्यामुळे आदिवासी ठाकूर कातकरी समाज संघटनेने विजेवर चालणारे दोन गिझर भेट देत गांधीगिरी केली आणि आदिवासी मुलींच्या आंघोळीचा प्रश्‍न निकाली काढला आहे. शेलू ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य बूधी दरवडा यांनी त्या मुलींसाठी विजेवर चालणारे गिझर उपलब्ध करून दिले आहेत. त्यावेळी वसतिगृहाच्या अधीक्षक एस.एस. जोहरे यांच्याकडे दरवडा यांनी ते नवीन गिझर सुपूर्द केले. तर, वसतिगृहात पाण्याची कमतरता असल्याबद्दल आपली समस्या अधीक्षक जोहरे यांनी नेरळ सरपंच उषा पारधी यांच्याकडे मांडली. सरपंच पारधी यांनीदेखील तात्काळ नवीन पाणी जोडणी देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावेळी आदिवासी संघटनेचे जिल्हा मालू निरगुडे, तसेच परशुराम दरवडा, सुनील पारधी, दत्ता निरगुडे, मनोहर ढुमणे आदी उपस्थित होते.

मुलींची गैरसोय होऊ नये यासाठी आम्हीदेखील विजेवर चालणारे दोन गिझर खरेदी केले आहेत. ती तात्पुरती व्यवस्था असून, इमारतीच्या छतावरील सोलर पॅनलची दुरुस्ती करण्याचे काम सुरु आहे. त्यांची दुरुस्ती झाल्यावर तो प्रश्‍न निकाली कायमस्वरूपी निघणार – एस.एस. जोहरे, अधीक्षक

Exit mobile version