अन्नपूर्णा देवीची वाराणसीत होणार पुनर्स्थापना

कॅनडातून आणली शतकापूर्वी चोरलेली मूर्ती
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अन्नपूर्णा देवीची दुर्मिळ मूर्ती वाराणसीमधून सुमारे 100 वर्षांपूर्वी चोरी करण्यात आली होती. अत्यंत दुर्मिळ अशी ही मूर्ती नुकतीच कॅनडामधून पुन्हा एकदा मिळवण्यात आली आहे. या मूर्तीची प्रतिष्ठापना आता पुन्हा एकदा मोठ्या धूमधडाक्यात काशी विश्‍वनाथाच्या मंदिरामध्ये करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 नोव्हेंबर 2020 च्या ङ्गमन की बातफमध्ये दिली होती. या मूर्तीची प्रतिष्ठापना येत्या 15 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने प्राप्त केलेली ही मूर्ती आता उत्तर प्रदेश सरकारकडे गुरुवारी एका कार्यक्रमाद्वारे दिल्लीमध्ये सुपूर्द करणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते काशी विश्‍वनाथाच्या मंदिरात या मूर्तीला पुनर्स्थापित करुन लोकार्पण करण्यात येणार आहे. ही मूर्ती उंचीने 17 सेंटीमीटर आहे, तिची रुंदी 9 सेंटीमीटर आहे तर तिची जाडी 4 सेंटीमीटर आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 नंतर मोदींच्या सत्ताकाळात 42 दुर्मिळ वारसा कलाकृती देशात परत आणण्यात आल्या आहेत. तर, 1976 ते 2013 दरम्यान केवळ 13 दुर्मिळ मूर्ती आणि चित्रे भारतात परत आणण्यात आली होती.
सध्यातरी, 157 शिल्पे आणि चित्रे परदेशात असल्याचं ओळखण्यात आलं आहे. त्यांना परत भारतात आणण्यासंदर्भात या देशांची वेगवेगळ्या आघांड्यावर चर्चा सुरु आहे. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि बेल्जियम देशांमधून या दुर्मिळ वस्तू आणण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. तसेच अमेरिकेतून 100 मूर्ती भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Exit mobile version