गोगावले नॉट रिचेबल; महाडमध्ये शिवसेनेत अस्वस्थता

| महाड | प्रतिनिधी |
शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडात महाडचे आ. भरत गोगावले यांचेही नाव पुढे आल्याने महाड, पोलादपूर मतदार संघात शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसत आहे. याबाबत प्रत्यक्षपणे कुणीही बोलायला तयार होत नसले तरी पक्षांतर्गत अस्वस्थता असल्याचे जाणवत आहे. गोगावले हे एकनाथ शिंदे याचे समर्थक मानले जात आहेत. सोमवारपासून गोगावले संपर्क क्षेत्राच्या बाहेर असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.


भरत गोगावले यांच्यासह अलिबागचे आ. महेंद्र दळवी आणि कर्जतचे आ. महेंद्र थोरवे हे तीन आमदार शिंदे यांच्यासोबत असल्याचे समजते. मंगळवारी शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था झालेली असली तरी गोगावले यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्‍वास असल्याने त्यांचा पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही स्वरूपाचे मत व्यक्त केले जाणार नाही, असे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. तालुकाप्रमुख सुरेश महाडिक उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, शहर प्रमुख नितीन पावले, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय सावंत, बंधु तरडे, आधी कार्यकर्त्यांची संपर्क होऊ शकला नाही. तसेच कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन सेनेचे शहरातील कार्यकर्ते सिद्धेश पाटेकर, नितीन पावले यांनी केले आहे.


एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार भरत गोगावले यांनी जो निर्णय घेतला आहे त्याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना जरी माहिती नसली तरी कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही चर्चा नाही, शिवसेनेमध्ये जे काही वरिष्ठ पातळीवर नाराजी व्यक्त केली जात आहे त्याचा स्थानिक कार्यकर्त्यांवर कोणताही परिणाम होणार नाही ही असा विश्‍वास शहरातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जो सेनेचा कार्यकर्ता आहे तो सेनेचाच राहील असे ठाम मत व्यक्त करण्यात आले.

Exit mobile version