तिजोरी उघडल्यान मंत्रीपद बासनात ?
| रायगड | खास प्रतिनिधी |
महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याची तिजोरी उघडली आहे. आमदार गोगावले यांना तब्बल 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सर्वाधिक निधी पदरात पाडून घेणारे आमदार म्हणून गोगावले यांच्याकडे पाहिले जात आहे. मोठ्या प्रमाणात निधीची खैरात दिल्याने गोगावले यांचे मंत्री पदाचे आणि पर्यायाने रायगडच्या पालकमंत्री पदाचे बंड बासनात गुंडाळल्याची जोरदार चर्चा आहे. मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने गोगावले यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांना कमी निधी मिळाल्याने गोगावले वरचढ झाल्याची जोरदार चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं. त्यावेळी त्यांना सर्वप्रथम साथ गोगावले यांनीच दिली होती. 2 जुलैला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये 41 हजार 243 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्यात आपल्या मतदारसंघाला 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या माहितीला गोगावलेंनी दुजोरा दिला.
भरत गोगावले यांनी निधी वाटपाच्या मुद्यावरून प्रथम ठाकरे सरकार व त्यानंतर आता अजित पवारांच्या नावाने टीकेची झोड उठवली होती. हे सर्वकाही ते मंत्रिपदाच्या इच्छेसाठी करत असल्याची चर्चा सुरू होती. यामुळे निधी वाटपात त्यांना डावलले जाईल असेही मानले जात होते. पण त्यानंतरही अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांना तब्बल 150 कोटींचा विकास निधी दिल्यामुळे सर्वच मंत्र्यांसह आमदारही अवाक झाले आहेत. मोठ्या प्रमाणात निधी देऊन पवारांनी गोगावलेंच्या मंत्रिपदाच्या इच्छेला लगाम तर घातली नाही ना असेही बोलले जात आहे.
गोगावले यांना तब्बल 150 कोटी रुपयांचा निधी तर अन्य आमदारांना 25-30 कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. त्यामुळे निधी मिळवण्यात गोगावले हे श्रीवर्धन मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार तथा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या पुढे असल्याचे दिसून येते. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे आग्रही असल्याचे बोलले जात होते. तर गोगावले हे देखील पालकमंत्री पदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होते. मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाच्या आमदारांची वर्णी लागली नाही. त्यामध्ये गोगावले यांच्या पदरी सुध्दा निराशा पडली होती. आता भरघोस निधी दिल्याने मंत्री पदाला आणि पर्यायाने पालकमंत्री पदाला ते मुरड घालून महाड मतदार संघात नंदनवन फुलवतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.