दहीहंडीसाठी आकर्षक मडकी बाजारात दाखल
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या उत्साहाला आता काहीच तास उरले असून, श्रीवर्धन शहर व परिसरातील बाजारपेठेत सणाची लगबग सुरू झाली आहे. या सणाचे मुख्य आकर्षण असलेल्या गोविंदा पथकांसाठी आणि घराघरांत पूजेसाठी लागणाऱ्या आकर्षक, रंगीबेरंगी मडकी श्रीवर्धन शहरात दाखल झाली आहेत.
कुंभारवाड्यातील स्थानिक उत्पादकांनी दहीहंडीसाठी खास विविध आकारांतील लाल मातीची मडकी तयार केली आहेत. यंदा पारंपारिक तांबड्या मडक्यांसोबतच काच, टिकल्या, मोरपीस आणि चमकदार रंगांची नक्षीकाम केलेली मडकी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. लहान मुलांच्या बाल-गोविंदा पथकांसाठी लहान आकाराची, तर मोठ्या मंडळांसाठी भव्य आणि नक्षीदार मडकी बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या विश्रांतीमुळे कुंभार बांधवांना मडकी सुकवणे आणि रंगवणे सोपे गेले आहे. श्रीवर्धन शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील गोविंदा पथके तसेच भाविक खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहेत. वाढत्या महागाईचा थोडा परिणाम रंग कामाच्या साहित्यावर झाला असला, तरी सणाचा उत्साह कायम ठेवण्यासाठी ग्राहकांकडून या मडक्यांना चांगली मागणी मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आम्ही गोकुळाष्टमीच्या दोन-तीन महिने आधीपासूनच कामाला लागतो. यावेळी पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने मडकी सुकवणे आणि भाजणे सुकर झाले. मात्र, चांगल्या दर्जाची माती मिळवणे कठीण झाले असून वाहतूक खर्च, रंग आणि डिझाईन साहित्याचे दर 20 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे मडक्यांच्या किमतीत किरकोळ वाढ करावी लागली आहे.
रविंद्र करंजकर उत्पादक
कुंभारवाडा ता. श्रीवर्धन
