छायाचित्रकार सुधीर नाझरे यांना सुवर्णपदक

। मुरूड । वार्ताहर ।

भारतात मनाची समजली जाणारी मुंबई फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाच्या 22 व्या इंटरनॅशनल छायाचित्र स्पर्धेत जगभरातून 48 देशांनी सहभाग घेतला 5431 हजारपेक्षा जास्त छायाचित्र परीक्षणासाठी आली त्यातील रायगडचे वृत्तपत्र छायाचित्रकार सुधीर नाझरे यांच्या आळंदीचे माऊली प्रस्थानाचे चित्र ट्रॅव्हल विभागात पी.एस.ए. गोल्ड मेडल बेस्ट स्टोरी व वृंदावन विडो होळीच्या फोटोला गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले. यावेळी मुंबईचे फिल्ममेकर ज्येेष्ठ कलाकार गंगाधर मेनन, अध्यक्ष आनंद निरगुडे, सचिव राजेंद्र वाघमारे, नितीन पवार, साशंक रणजित, समीर मोहिते, गणेश मेमाणे आदी नामांकित छायाचित्रकार उपस्थित होते .


सुधीर नाझरे गेली 24 वर्ष वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून विविध वृत्तपत्रात काम करत आहेत. महाराष्ट्रातील 43 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांचे महाराष्ट्रात 12 ठिकाणी छायाचित्रांचे प्रदर्शन झाले आहे. मागील 3 वर्ष जागतिक स्पर्धेत नाझरे यांनी भाग घेण्यास सुरूवात केली. आज त्यांच्या विविध चित्रांना 198 गोल्ड मेडल प्राप्त झाले आहेत. फोटोग्राफी सोसायटी ऑफ अमेरिकाचे अनेक गोल्ड मेडल मिळवून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेले चित्र जगासमोर नेहमीच्या मांडत आले आहेत.


गंगाधर मेनन म्हणाले, छायाचित्रण स्पर्धेत 48 देशाचे नामवंत छायाचित्रकार सहभागी झाले. प्रदर्शनातील विजेते फोटो अतिशय सुंदर आणि बोध देणारे आहेत. कलेचा वारसा जागतिक पातळीवर पुढे नेण्याचे काम मुंबईची फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया सातत्याने करत आहे. प्रदर्शनात 9 दिवस विविध नामवंत छायाचित्रकारांचे अभ्यासपूर्ण प्रशिक्षण ठेवण्यात आल्याने नवीन होतकरू छायाचित्रकारांना पर्वणीच आहे. ते सूचना करताना म्हणाले, स्पर्धेत ब्लॅक अँड व्हाईट व मोनोक्रोम हे दोन्ही वेगळे विषय असल्याने पुढील काळात विषय देताना दोन स्वतंत्र विषयाचे फोटो मागावा.प्रदर्शनात विजेते 76 फोटो लावण्यात आली आहेत.26 छायाचित्रे परदेश छायाचित्रकारांची आहेत. तर 50 छायाचित्रे भारतीय आहेत. नितीन जैन, हुसना खोत, भास्कर आठवले, गणेश मेमाणे, यशोधन नवघरे, आमोद कुमार, रवींद्र कांबळी, अंकुर तांबे आदी नामवंत छायाचित्रकारांची चित्रे भारतीय विद्या भवन येथे लावण्यात आली आहेत.

Exit mobile version