एमपीतून 1.42 कोटींचा मुद्देमाल हस्तगत
एसीबीची कामगिरी
। अलिबाग | विशेष प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे एक्सेफ्रेस हायवेवरील खोपोली हद्दीत असलेल्या फुडमॉल पार्कींगमधून वाहनातून 1 कोटी 44 लाख रुपये किमतीची 2.732 किलोचे दागीने व सोन्याची बिस्कीटे चोरीची घटना मागील आठवडयात झाली होती. यातील आरोपीच्या मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील खैरवा मनावर येथून घरातून त्यांने ठेवलेल्या जागेवरून सदर मुद्देमाल हस्तगत करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या प्रकरणातील आरोपी पप्पु बाबु खान मुलतानी या फरार आरोपीचा तपास पोलिस घेत आहेत.
या गुन्ह्याचा तपास लवकर व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अधिकारी व पोलीस अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. एक पथकामार्फत अशा प्रकारचे गुन्हे करणारे बाहेर रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच बाहेरील राज्यांतील आरोपीत यांचा शोध घेणे तसेच दुसरे पथकामार्फत घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी करण्याचे काम सुरु होते.
तपास पथकास घटनास्थळवरील सी.सी.टी.व्ही. कॅमे-यामध्ये संशयीत आरोपीचे फोटो मिळाले होते. सदर फोटोंच्या सहायाने तसेच गुप्तबातमीदारामार्फत माहीती घेत असतांना पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी हे मध्य प्रदेश राज्यातील खैरवा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोहवा राजेश पाटील, यशवंत झेमसे व प्रतिक सावंत असे पथक मध्यप्रदेश राज्यामध्ये रवाना झाले. या ठिकाणी जावून सीसीटीव्ही मधील फोटोच्या आधारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी हा पप्पू बाबू खान मुलतानी, मध्यप्रदेश येथे असल्याची खात्री झाली. त्यानुसार संशयीत आरोपी पप्पू बाबू खान याच्या घरी छापा टाकला असता आरोपी तेथे नव्हता. त्यानुसार घराची घरझडती घेतली असता झडतीमध्ये काही सापडले नाही.
त्यानंतर आरोपीचा सख्खा भाऊ ईस्माईल बाबू खान, वय 27 वर्षे, याच्याकडे पप्पू बाबू खान व गुन्हयातील मालाबाबत चौकशी केली असता पप्पू बाबू खान याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याचे सांगून आरोपीत पप्पू बाबू खान याने त्याच्याकडे ठेवण्यास दिलेली एकूण 2.684 कि.ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे व दागिने असा मुद्देमाल पोलिसांना सुपूर्द केला. याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीचा पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणात पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्यासह सपोनि नागेश कदम, सहा फौजदार दिपक मोरे, देवराम कोरम, हवालदार राजेश पाटील, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, शिपाई इश्वर लांबोटे आदींचा सहभाग होता.