। नेरळ । प्रतिनिधी ।
नरेंद्र मोदी यांची लाट जशी आली होती, तशी लाट अशी ओसरू लागली आहे. त्यामुळे देशात पुन्हा काँग्रेसमय वातावरण होऊ लागले असून,कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामास लागावे, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी कर्जत येथे केले. तालुका आढावा बैठकीत बोलताना राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी बोलताना कर्जत तालुक्यात रायगड जिल्ह्यात काँग्रेसचा सुवणकाळ पाहिलेले कार्यकर्ते आहेत. या भागातील तालुका अध्यक्ष हे वाहत्या नौकेत गेले आहेत.त्यामुळे आपल्या पक्षाला नवीन तालुका अध्यक्ष नेमायचा असून पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकमताने नाव सुचवा आणि नवीन अध्यक्ष जाहीर करा असे आवाहनही त्यांनी केले.
पक्षातून कोणाला जायचे त्यांनी जावे मात्र गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे या उक्तीप्रमाणे आपण काम करायला हवे आहे. आपला तालुका अध्यक्ष असा असावा की त्यांनी महापुरुष यांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी झाली पाहिजे, आंदोलने केली पाहिजे आणि त्यासाठी कर्जत किंवा नेरळ मध्ये कार्यालय सुरू झाले पाहिजेत. कार्यालय शोधा त्यासाठी आम्ही बाकी बघतो असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले. खालापूरमध्ये चांगले अध्यक्ष मिळाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पक्षाने चांगले काम सुरू केले आहे. कर्जत तालुका तर सुवर्ण काळ पाहिलेला तालुका असल्याने तुम्ही भरारी घ्यायला हवी.पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानने पक्षाची चांगली हवा निर्माण झाली आहे.त्याचा फायदा काँग्रेस पक्षाने घ्यावा असे आवाहन देखील महेंद्र घरत यांनी केले.
बैठकीला मिलिंद पाडगावकर, किरीट पाटील, योगेश भोईर, महेंद्र नाखवा ,तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी, माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, मनीष राणे, अरविंद कटारिया, आसिफ अत्तार, दत्तात्रय सुपे, कृष्णा बदे, जगन्नाथ शेळके, लक्ष्मण ऐनकर, सुरेश चंचे ,मोहम्मद नजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मिलिंद पाडगावकर , धनंजय चाचड ,नेरळ शहर कार्याध्यक्ष संतोष पेडामकर यांनी काही सूचना मांडल्या.
खारीक यांची हकालपट्टी
धनंजय चाचड यांनी पक्षावाढीचे कोणतेही काम न करणार्या शिवाजी खारीक यांची हकालपट्टी करण्यात यावी असा ठराव मांडला.त्यास चंद्रकांत मांडे यांनी तसेच आढावा बैठकीत उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले.
अध्यक्षपदासाठी चार इच्छुक
कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष पदासाठी चंद्रकांत मांडे, संजय गवळी, अरविंद कटारिया,मनीष राणे यांनी इच्छुक म्हणून आपली नावे दिली आहेत.
कर्जत तालुका अध्यक्ष म्हणून नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असून याच महिन्यात तालुका मेळावा घेऊन तालुका अध्यक्ष निवडला जाईल . पक्षातून जे जे गेले ते त्याचा विचार न करता गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे या उक्तीप्रमाणे पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर घ्यावा.
महेंद्र घरत,जिल्हाध्यक्ष