कर्जतच्या आमदारांचा टेबलावरील डान्स अशोभनीय; कार्यकर्त्यांकडून टीका
। नेरळ । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन हा पक्षासाठी पुन्हा सुगीचे दिवस आणणारा आहे. पुढील भूमिका शेकापसाठी महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाला रायगड जिल्ह्यात पुन्हा सुवर्णयुग आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन बाळाराम पाटील यांनी केले.शेतकरी कामगार पक्षाच्या दोन ऑगस्ट रोजी होणार्या वर्धापन दिनानिमित्त नियोजनाची बैठक सोमवारी (दि.18) नेरळ येथील शेतकरी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप नाईक, जिल्हा पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष देवा पाटील, ज्येष्ठ नेते विलास थोरवे, प्रभारी तालुका चिटणीस श्रीराम राणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत जाधव, जयवंती हिंदोळा, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पेमारे, सरपंच पंढरीनाथ पिंपरकर, माजी सरपंच पुंडलिक शिणारे, युवक तालुका अध्यक्ष वैभव भगत, नितेश शहा, पांडुरंग बदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना आ. बाळाराम पाटील यांनी सांगितले कि, कर्जत तालुका शेकापक्षाचा बालेकिल्ला आहे. त्याच बालेकिल्ल्यातील अन्य पक्षाच्या आमदारांनी टेबलावर केलेला डान्स सर्वांची मान खाली घालवणारी घटना आहे. कर्जतचे आमदार गोव्यात टेबलावर नाचत होते. हे संपूर्ण जगाने पाहिले. सांगोल्याचे आमदार जे बोलले त्यापेक्षा कर्जतच्या आमदारांचा डान्स भयानक होता. आमदार कसे कसे वागू शकतात, हे मागच्या काही दिवसात दिसून आले. त्यामूळे आपल्याला असे आमदार द्यायचे आहेत काय? आपल्या पक्षाचा वेगळा राजकीय पायंडा आहे. त्यामुळे शेकापचा बालेकिल्ला पुन्हा नव्याने मजबूत करायचा आहे. पेण, पनवेल, अलिबाग, उरण या मतदारसंघात पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस आणायचे आहेत. तालुक्यात आघाडी-युती याबाबत जो निर्णय घ्यायचा आहे, तो सर्वांनी बसून घेऊ, असे आवाहनही त्यांनी केले.
तरुणांना मार्गदर्शनाची गरज
कर्जत तालुक्यातील तरुण मोठ्या प्रमाणत शेतकरी कामगार पक्षकडे वळला आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे, अशी सूचना करून वर्धापन दिनीनिमित्त तरुणांना घेवून यावे. पक्षप्रमुखांचे भाषण होईपर्यंत कार्यकर्त्याने तेथून बाहेर निघू नये, असे आवाहनही आ. बाळाराम पाटील यांनी केले. गतवर्षी उरण येथे पनवेल आणि उरण या दोन तालुक्याच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खर्या अर्थाने रिचार्ज झालो. दोन ऑगस्ट रोजी होणारा मेळावा रिचार्ज होण्यासाठी महत्वाचा क्षण असणार आहे, असा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला.
जनतेची दिशाभून करणारं सरकार
ज्येष्ठ नेते विलास थोरवे यांनी पंढरीची वारी जशी वारकरी चुकवत नाहीत तसे शेकापचे कार्यकर्ते पक्षाचा वर्धापन दिनचा सोहळा चुकवित नाही. सध्या राजकारण कशा पदधतीने चालले आहे याचा विचार करण्याची वेळ सर्वांवर आली आहे. जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून इडी सारखे नवीन विषय समोर आले आहेत. हे सरकार जनतेची दिशाभूल करीत आहेत.
प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र व्यवस्था असेल. त्यामुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. घरातून निघताना गाडीला झेंडा लावून यायचे आहे. 28 जुलैपासून शेकाप वर्धापन दिनाबाबतची माहिती परिसरात सर्वांना होणे अपेक्षित आहे. जयंत पाटील हे आपले नेते सर्वांना उपलब्ध असतात. कर्जत आणि खालापूर तालुक्यात आमदार नाही, खासदार नाही तरी देखील आपण या ठिकाणी हिमतीने काम करीत आहोत. त्यामुळे या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचे कौतुक निश्चित केले पाहिजे. आगामी काळात आपण कोणाबरोबर आघाडी करायची हे पारखून घेवू. सध्या कोणीही कोणालाही आश्वासने देऊ नयेत. असे यावेळी आस्वाद पाटील यांनी जाहीर केले.त्याचवेळी शेकापला घेतल्याशिवाय कोणालाही रायगड जिल्हा परिषदेची सत्ता घेता येणार नाही हे लक्षात घेवून आपल्या पक्षासाठी राजकीय काळ महत्वाचा आहे.
अॅड. आस्वाद पाटील, शेकाप, जिल्हा चिटणीस