बाळाराम पाटील यांना चांगला प्रतिसाद

। पनवेल । वार्ताहर ।

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडून पनवेल विधानसभा निवडणूक लढवत असलेले बाळाराम पाटील यांच्यावर अन्याय झाल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. याच भावनेतून कार्यकर्ते बाळाराम पाटील यांच्या निवडणूक चिन्ह असलेली शिट्टी घरोघरी पोहचवण्यासाठी मेहनत घेत आहे. यामुळे अल्पावधीतच शिट्टी हे चिन्ह घरोघरी पोहचवण्यात शेकाप कार्यकर्त्यांना यश आलेले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओळख निर्माण केलेल्या बाळाराम पाटील यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराला चांगली साथ दिली होती. याच साथीच्या जोरावर महाविकास आघाडीतून मशाल या चिन्हावर मावळ लोकसभेची निवडणूक लढवलेल्या संजोग वाघेरे यांना उरण आणि कर्जत मतदार संघातून आघाडी मिळाली होती. तर, पनवेल विधानसभा मतदार संघातदेखील चांगली मते मिळाली होती. यामुळे पनवेल आणि उरणमधील विधानसभेच्या जागा शेकापला मिळतील अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, निडणुकीआधी उमेदवारीबाबत एक मत न झाल्याने शेकाप आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाने स्वतंत्र्यपणे उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला होता. असे असले तरी आघाडीतील प्रमुख पक्ष असलेले राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार), कॉग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी तसेच स्वतंत्रपणे उमेदवारी दिलेल्या शिवसेना (उध्दव ठाकरे) गटातील कार्यकर्ते बाळाराम पाटील यांच्या शिट्टीचा प्रचार करताना दिसत आहेत.

Exit mobile version