। अलिबाग । प्रतिनिधी ।
एक दिवस मनोभावे पूजा, सेवा केल्यानंतर साखर चौथच्या गणरायाला रविवारी सायंकाळी भावपूर्ण निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे जड अंतःकरणाने आवाहन करीत जिल्ह्यातील 879 गणेशमूर्तींचे तलाव, नदी, समुद्रात विसर्जन करण्यात आले. दरम्यान, विसर्जन घाटांवर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
साखरचौथच्या बाप्पाचे शुक्रवारी सकाळी वाजत गाजत स्वागत करण्यात आले. सकाळपासून भजनांसह सांस्कृतिक कार्यक्रम, बाल्या नृत्य व इतर मनोरंजनात्मक खेळ खेळत रात्रभर गणरायाची सेवा करण्यात आली. महिलांनीदेखील या उत्सवात सहभागी होत वेगवेगळ्या पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करीत जल्लोष साजरा केला. एक वेगळा आनंद व उत्साह प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसून येत होता. मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी सायंकाळी बाप्पाला निरोप देण्यात आला. काहींनी डोक्यावर, गाडीतून बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढली. वेगवेगळ्या गाण्यांच्या ठेक्यावर नाचत बाप्पाच्या मिरवणुकीत अनेक जण सहभागी झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोषदेखील करण्यात आला. सायंकाळी पाचनंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. काहींनी पारंपरिक पेहराव केला होता, तर काहीजण नवनवीन कपडे परिधान करून मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठीदेखील वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. रात्री दहा वाजेपर्यंत मिरवणूक झाल्यानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.