रायगड जिल्हा परिषदेचे प्रयत्न अपयशी
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
दरडीपासून बचाव करण्यासाठी जिल्हा परिषदेने बांबू लागवडीवर भर दिला. यातून जमिनीची धूप थांबविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील दरडग्रस्त भागात व मोकळ्या जागांमध्ये आठ लाख बांबूची लागवड करण्याचा उद्दिष्ट समोर ठेवले होते. परंतु, एक वर्ष होत आले तरी हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा परिषद अपयशी ठरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात फक्त दोन लाख बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
मागच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. महाड येथील तळीये येथे 23 जुलै 2021 मध्ये दरड कोसळली. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलादपूर, कर्जत, खालापूर तालुक्यातदेखील दरड कोसळली. दरडीमध्ये सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांचा जीव गेला. दगड, मातीने गावांतील घरे तसेच गावेदेखील उद्ध्वस्त झाली. या घटना घडून दोन ते तीन वर्षे होत आली आहेत. या दुर्घटनेनंतर दरड रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने उपाययोजना सुरु केल्या. बांबू लागवड केल्यास जमिनीची धूप रोखली जाईल. यातून दरडीचा धोका टाळण्यास मदत होईल, या उद्देशाने डोंगर भागासह मोकळ्या जागेत बांबूची रोपे लावण्याचा निर्णय घेतला.
गतवर्षापासून जिल्ह्यातील गावे, वाड्यांच्या भागात बांबुची लागवड करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तालुका, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाऊंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवक यांचा बांबू लागवडीसाठी लोकसहभाग घेतला. जिल्ह्यात सुमारे आठ लाख बांबूची बेटे तयार करण्याची तयारी दाखविली. सुरुवातीला महाडमध्ये बांबूची लागवड करण्यास सुरुवात केली. परंतु, आतापर्यंत फक्त दोन लाख बांबूची लागवड करण्यास जिल्हा परिषद यशस्वी ठरली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात ग्रामपंचायतीकडून 87 हेक्टर क्षेत्रामध्ये 80 हजार बांबूची लागवड केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात बांबू लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कधी पूर्ण करणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.