गोपाळ समाजाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
राज्यात विविध स्तरीय निवडणुकांचे वारे वाहत असताना राजकीय भूकंप ही काही नवीन बाब नाही. अशीस एक उलथापालथ फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात झाली आहे. गोपाळ समाजातील शेकडो बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
याप्रसंगी सातत्याने विविध पक्षाच्या नेत्यांकडून फसवणुकीला बळी पडलेल्या या समाजाच्या प्रगतीसाठी किंबहुना सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आगामी काळात सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत, असे आश्‍वासन जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी दिले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात केवळ या भागातील मतांवर डोळा ठेवून असलेल्या अनेक नेत्यांना या प्रवेशातून मोठा धक्का बसल्याची चर्चा विविध पातळीवर रंगत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी आपल्या मनोगतात, या मतदारसंघांमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करत असताना कोणीही या पक्ष कार्यामध्ये आडवे आल्यास त्यालाही मात देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. राज्यात आमचे सरकार आहे, त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळवून देताना कोणताही प्रसंग असो, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य विनोद मार्गज, कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुंदर पारकर, युवक राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली तालुका युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सागर वारंग, कणकवली शहर अध्यक्ष संदेश मयेकर, कृषी सेल तालुकाध्यक्ष चंद्रकांत नाईक, निखिल गोवेकर, अजय जाधव, अन्वर साठी, वैभव सावंत, विनोद डगरे, सखाराम हुंबे, सेनापती सावंत, उत्तम तेली आदी उपस्थित होते.

Exit mobile version