। अलिबाग । प्रतिनिधी ।
गोविंदा रे गोपाला,यशोदेच्या तान्हा बाळा, बोल बजरंग बलि की जय, गोविंदा आला रे आला, जरा मटकी सांभाल ब्रीजबाला, अशा गीतांच्या तालावर नाचत, ढोलताशांच्या निनादात बेभान होत रायगडात शुक्रवारी गोविंदा उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी बांधलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोपालांबरोबरच गोपिकाही आघाडीवर होत्या.

तब्बल दोन वर्षानंतर गोविंदा खेळण्याची मुभा मिळाल्याने आबालवृद्धांचा आनंद द्विगुुणीत झाला होता. रायगडात सकाळपासूनच बच्चेकंपनीची धूम सुरु होती. अऩेक सार्वजनिक मंडळांनी, राजकीय पक्षांनी छोट्या, मोठ्या बक्षिसांच्या हंड्या बांधून गोविंदा पथकाना खेळण्याची संधी दिली होती. सर्वच शहरे, गावागावात बांधलेल्या या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदाची पथके गावागावात फिरताना दिसत होती. अंगात विविध रंगांच्या जर्सी, डोक्याला रिबीन असा पारंपारिक वेष परिधान करुन ग्रुपने हे गोविंदा फिरत होते. हंडी दिसली रे दिसली की मनोरे रचत ती फोडली जात होती. हंडी फुटली की गोविंदा, गोविंदा असा जयघोष करत पुढची हंडी फोडण्यासाठी मार्गस्थ होत होती. असे वातावरण दिवसभर रायगडात सर्वत्र होते.
यावेळी गोपिका पथकेही हंड्या फोडण्यासाठी दिसत होती. त्यामुळे उत्साहात आणखी भर पडत राहिली. पावसानेही जोरदार हजेरी लावल्याने हंड्या फोडणार्या गोविंदा, गोपिका पथकांचा उत्साह आणखी वाढला होता.
पोलिसांची करडी नजर
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात गुरुवारी हरीहरेश्वर किनारी संशयास्पद बोट आढळून आल्याने खबरदारी म्हणून जिल्हा पोलीस यंत्रणेने सगळीकडे करडी नजर ठेवली होती. महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करुन प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती.