जखमी झालेल्या गोविंदाची मृत्यूशी अपयशी झुंज

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मुंबईतील दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या करी रोड येथील गोविंदाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

दहिहंडी खेळताना थरावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या तरुणाचे आज मुंबईतील केईएम रुग्णालयात निधन झाले. प्रथमेशवर मागील महिनाभरापासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याला न्युमोनिया झाला. त्याच दरम्यान आज सकाळी त्याला कार्डिएक अरेस्ट आल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रथमेश सावंतचे वय 20 वर्ष होते. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रथमेश लहान असताना त्याच्या आईचे कॅन्सरने निधन झाले होते. त्यानंतर त्याचे वडील आणि बहिणीचे एका आजाराने निधन झाले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या प्रथमेशचा सांभाळ चुलते करत होते. आयटीआयचे शिक्षण घेतानाच डिलिव्हरी बॉय म्हणून घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे कामही तो करत होता.

प्रथमेशच्या उपचारासाठी मोठा खर्च आला होता. त्यासाठी काहींनी मदत केली होती. तसेच प्रथमेशला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई काँग्रेस आणि शिवसेनेनं पुढाकार घेतला होता. मात्र, आज त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

Exit mobile version