। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ ग्रामपंचायत सदस्यांच्या राजीनाम्यानंतर विभागीय आयुक्तांनी नेरळ ग्रामपंचायत विसर्जित केली होती. तर, या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी प्रशासकावर आली आहे. अशातच डेंग्यूने थैमान घातलेल्या नेरळ शहरात सध्या ग्रामस्थांना स्वच्छता, आरोग्य सुविधा पुरवण्यावर प्रशासक सुजित धनगर यांनी भर दिला आहे. यासाठी सकाळी 6ः00 वाजता नेरळमध्ये पोहचून कर्मचार्यांच्या कामाचा आढावा घेत त्यांना सूचना दिल्या आहेत.
नेरळ ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्यात मतभेद वाढून सरसकट सर्व सदस्यांनी राजीनामा दिला होता. यामुळे कोकण विभागीय आयुक्तांनी नेरळ ग्रामपंचायत विसर्जीत केली होती. यानंतर जिल्हा परिषदेमध्ये लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता असलेले सुजित धनगर यांना नेरळ ग्रामपंचायतीच्या प्रशासकाची जबाबदारी देण्यात आली आहे. धनगर यांनी बुधवारी (दि.23) सकाळी 6 वाजता नेरळमधील स्वच्छता करणार्या ग्रामपंचायत कर्मचार्यांची भेट घेतली. शहरात सध्या डेंग्यू सदृश्य परिस्थिती असल्याने स्वच्छतेत कुचराई नको, अशा सूचना त्यांनी कर्मचार्यांना दिल्या आहेत.
यावेळी नेरळ शहरातील सर्व प्रभाग सकाळी फिरून तेथील कर्मचारी हे आपले काम चोख पार पडत आहेत याची खात्री करून घेतली. यासह सकाळी आलेल्या काही नागरिकांकडून तेथील समस्या देखील जाणून घेतल्या. तर, सकाळी नेरळ शहरात पाणी सोडण्यास सुरुवात केली जाते. तेव्हा थेट बोर्ले येथील जल शुद्धीकरण प्रकल्पावर भेट देत तेथील अडचणी जाणून घेत नेरळ शहराला शुद्ध व पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती धनगर यांनी दिली आहे.