ग्रा.पं. निवडणुकीत नेतृत्वाचा लागणार कस

माणगाव-पोलादपुरात आगामी जि.प.ची, तर महाडला विधानसभेचीच रंगीत तालीम

| पोलादपूर | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाड तालुक्यात सर्वात जास्त 73, पोलादपूरमध्ये 16 तर माणगावात 19 ग्रामपंचायती अशा एकूण 108 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. माणगाव व पोलादपूर तालुक्यात आगामी जिल्हा परिषदेच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे, तर महाड तालुक्यात संभाव्य विधानसभा उमेदवाराच्या नेतृत्वाची परीक्षा मतदारांकडून घेतली जाणार आहे, असे राजकीय वर्तुळात मानले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 आणि डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपुष्टात येणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 18 डिसेंबरला मतदान आणि 20 डिसेंबरला मतमोजणी असा जाहीर केला आहे. त्यानुसार सध्या निवडणूक आचारसंहिता 18 नोव्हेंबरपासून जारी झाली असून, उमेदवारी अर्ज दि.28 नोव्हेंबरपासून दि. 2 डिसेंबर 2022 पर्यंत दाखल करायचे आहेत. दि. 5 डिसेंबर रोजी छाननी होईल, अर्ज मागे घेण्याची मुदत 7 डिसेंबरपर्यंत असून, यावेळी बिनविरोध उमेदवारांची निवड समजून येणार आहे.

पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, गोळेगणी, कालवली, कापडे खुर्द, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, धामणदिवी, लोहारे, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले आणि उमरठ या ग्रामपंचायतींची मुदत गेल्या सप्टेंबर 2022 मध्ये संपुष्टात आली असून, या 16 ग्रामपंचायतींचा निकाल पहिल्या चार ग्रामपंचायतींनुसार लागण्याची शक्यता नसल्याची चर्चा आहे. यामुळे महाविकास आघाडी विरूध्द बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी जोरदार सुरू आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक व पदाधिकारी यांनी अंतर्गत हालचाली वाढवून शिवसेनेवरील प्राबल्य सिद्ध करण्याचा चंग बांधला असताना या पक्षाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहकार्य केले जात आहे.

महाड तालुक्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेल्यानंतर अलीकडेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेशकर्ते झाले असून, अन्य पक्षांकडून या फुटीचा फायदा उचलला जात नसल्याने नजीकच्या काळात या निवडणुकीचा वेगळाच निकाल प्राप्त होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Exit mobile version