खारपालेतील माजी सरपंचावर तलवारीने हल्ला

। पेण । वार्ताहर ।
खारपालेचे माजी सरपंच तथा सध्याचे सदस्य किरण मुकुंद तुरे यांच्यावर शशांक श्रीकांत ठाकूर याने धारदार तलवारीने हल्ला केला असून या हल्ल्यात किरण तुरे बचावले आहेत. शशांक याने किरण तुरे यांच्या मालकीची ह्युंदाई ग्रॅन्ड आय 10 एम.एच.06 बीयू. 3743 नंबरच्या गाडीवर तलवारीने वार करून गाडीचेही मोठया प्रमाणात नुकसान केले आहे.

याबाबत वडखळ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, किरण तुरे यांनी देवळी गावाच्या हद्दितील शालीमार हॉटेल समोरील सुरू असलेल्या कामाची मोबाईलने शुटींग घेतल्याचा राग डोक्यात ठेऊन शशांक ठाकूर याने किरण तुरे यांचे लक्ष नसताना त्यांच्यावर हल्ला चढविला.

या हल्ल्यात किरण तुरे यांना पायाला व हाताला दुखापत झाली असून वडखळ पोलीस ठाण्यात शशांक विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून विना परवाना धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडखळ पोलिसांनी आरोपी शशांक याला अटक केले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 7 सप्टेंबरपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबकर करीत आहेत.

Exit mobile version