नाट्यांकुर नाट्य महोत्सवाला उदंड प्रतिसाद

| चिरनेर | प्रतिनिधी |

शालेय रंगभूमीवर उद्याचे तारे घडतील, असा विश्वास संदेश महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला. इंदिरा गांधी महाविद्यालय आणि संदेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यमाने माटुंगा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलामध्ये गुरुवारी (दि.11) नाट्यांकुर नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय व मुंबई विभागीय नाट्य स्पर्धेत संदेश विद्यालयाने ‘संगीत एच टू ओ’, ‘मिसेस लक्ष्मी’, ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’, ‘पाकिस्तानचं यान’ या चार एकांकिकांचे स्पर्धेत सादरीकरण केले होते. या चारही एकांकिका प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. या चारही एकांकिकांच्या नाट्य कलाकृतीचे सादरीकरण शाळेतील विद्यार्थ्यी, शिक्षक, पालक यांच्यासह नाट्य रसिकांना पाहता यावे, यासाठी नाट्यांकुर नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एकांकिकांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना नवी दिशा मिळते. संदेश विद्यालय सांस्कृतिक चळवळीचे प्रतीक असून या विद्यालयाच्या रंगभूमीवर आज नवोदित कलाकार आत्मविश्वासाने उभे राहत आहेत. समाज प्रबोधन करणाऱ्या या एकांकिकांमधून कलाकारांनी आपल्या अभिनयातून समाजातील विविध प्रश्न, नातेसंबंध, संघर्ष मूल्य व वास्तव मांडत, विविध सामाजिक, आशयघन एकांकिकांमधून कलाकारांनी विचार प्रवर्तक कलाकृती सादर करून, आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. यावेळी कलाकारांच्या अभिनयात एक प्रामाणिकपणा जाणवला. यावेळी लेखक दिग्दर्शक सुयश राजेंद्र म्हात्रे यांच्या एकांकिकांच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आले.

Exit mobile version