ऐन उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा

दूध उत्पादनात मोठी वाढ; शेतकर्‍यांमध्ये आनंदाचा वातावरण

| माणगाव | वार्ताहर |

उन्हाळ्याच्या दिवसात दुग्धोत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना गुरांसाठीच्या हिरव्या चार्‍याची चिंता सतावत असते. ऐन उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने दूध उत्पादनात लक्षणीय घट होते. ही घट भरून काढण्याचा शेतकर्‍यांचा नेहमीच प्रयत्न असतो. उन्हाळी दिवसात सुका पेंडा व इतर खाद्यान्नच उपलब्ध होते. मात्र, यामुळे दूध उत्पादनात वाढ होत नाही. उन्हाळी दिवसात दुधाची घट भरून काढण्यासाठी तालुक्यातील शेतकर्‍यांनी मका, ज्वारी इत्यादीची लागवड केली असून, यामुळे ऐन उन्हाळ्यातही गुरांना हिरवा चारा उपलब्ध झाला आहे.

दूध उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांनी शेतामध्ये जानेवारी महिन्यात मका- ज्वारी इत्यादी हिरवा पाला देणार्‍या पिकांची पेरणी केली होती. उन्हाळ्यात ही पिके बहरली असून, या हिरव्या चार्‍याचा उपयोग दूध देणार्‍या जनावरांना खाद्य म्हणून केला जात आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यातही दुधाच्या उत्पादनात घट झाली नसून, चांगले दुग्धोत्पादन होत आहे. यामुळे शेतकरी सुखावले आहेत. स्वतःच्या किंवा भाड्याने घेतलेल्या शेतीमध्ये उन्हाळी दिवसात मका, ज्वारीचे पीक फक्त गुरांना खाद्य म्हणून घेतले जात आहे. काही एकर जागेवर शेतकर्‍यांनी मका, ज्वारीचे पीक घेतले असून, या हिरव्या चार्‍याचा उपयोग दूध उत्पादन वाढीसाठी होत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले आहे.

उन्हाळ्यात गुरांना हिरव्या चार्‍याची कमतरता असते. यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन घटते. यावर उपाय म्हणून मका, ज्वारीचे पीक गुरांना चारा म्हणून शेतात लागवड केली आहे. यामुळे दूध उत्पादन चांगले होत आहे

सिद्धेश पालकर, दुग्धोत्पादक माणगाव

मका, ज्वारीच्या लागवडीतून उन्हाळी दिवसात दूध देणार्‍या गुरांना हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादनात घट झाली नसून, चांगले उत्पादन होत आहे.

योगेश खडतर, दुग्धोत्पादक माणगाव


Exit mobile version