पोलीस हुतात्मा दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पोलीस हुतात्मा दिनानिमित्त रायगड पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. रायगड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शहीद स्मारकास रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी आणि जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून सलामी देण्यात आली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक (गृह), उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग सोनाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा किरणकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

या परेडमध्ये सन 2020-2021 मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या एकूण 377 शहिदांना आदरांजली म्हणून हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा किरणकुमार सूर्यवंशी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग सोनाली कदम यांनी वीरगती प्राप्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे वाचली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार दिनेश बिर्जे यांनी केले. यावेळी 18 पोलीस अधिकारी व 109 पोलीस अंमलदार हजर होते. हुतात्मा परेडकरिता परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय दशरथ हाटकर तसेच 45 एकूण पोलीस जवान, पोलीस बॅड पथक यांनी मानवंदना दिली.

Exit mobile version