। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमध्ये नव्याने तीनशे खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. नवीन आंतररुग्ण इमारतीचा भूमीपूजन सोहळा बुधवारी (दि. 5) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थित महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विक्रांत पाटील, विधानसभेचे आमदार महेश बालदी, महेंद्र थोरवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तळमजल्यासह सात मजली ही इमारत असणार आहे. या इमारतीमध्ये प्रशाकीय कार्यालय, शस्त्रक्रिया सेंटर, अतिदक्षता विभाग, अपघात विभाग, कॅन्टीन तसेच 300 खाटांचे रुग्णालय असणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 105 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आजवानी या कंपनीमार्फत इमारतीचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.