शेतकर्यांचे होतेय लाखो रुपयांचे नुकसान; आमसभेत शेतकर्यांनी व्यक्त केली खंत
। चिरनेर । प्रतिनिधी ।
जंगली मोकाट गुरे व जंगली वानरांच्या त्रासामुळे उरण तालुक्यातील चिरनेर येथील शेतकरी हैराण झाले आहेत. ही मोकाट गुरे व वानरे कडधान्य पिकांची नासाडी करत असल्यामुळे येथील शेतकर्यांना लाखो रुपयांचे उत्पादन मिळवून देणारा रब्बी हंगामी कडधान्य पिकांचा व खरीप हंगामातील भात पिकांचा पारंपरिक शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.
रब्बी हंगामात लाखो रुपयांचे उत्पादन मिळवून देणार्या कडधान्य पिकांच्या संरक्षणासाठी शासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी महाराष्ट्र शासनाचे शेतीनिष्ठ शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी उरण येथे झालेल्या आमसभेत केली. चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पिढ्यान पिढ्या चालत आलेला शेती व्यवसाय अजून शाबूत ठेवला असून सन 2018-19 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत श्री महागणपती सेंद्रिय शेतकरी गटाची निर्मिती करून आपल्या पारंपारिक शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करून खरीप व रब्बी हंगामात जास्त उत्पादन देणारी वेगवेगळी पिके येथील शेतकरी घेत आहेत.
परिणामी जेएनपीटी विस्थापित गावकर्यांनी त्यांच्याकडे असलेले पशुधन गाव सोडताना त्यांनी कर्नाळा अभयारण्य व चिरनेर रानसई जंगल भागात सोडून दिल्यामुळे ही मोकाट गुरे खरीप हंगामात भातपिकांचे तर रब्बी हंगामात कडधान्य पिकांचे नुकसान करीत आहेत. कडधान्य पिकांबरोबरच येथील शेतकर्यांच्या आंबा पिकांचेदेखील या वानरांकडून नुकसान होत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
आंबा पिकांना मोहोर धरल्यापासून ते फळ काढणीपर्यंत आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. असेही शेतकर्यांनी सांगितले. या गंभीर समस्येमुळे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवू लागले आहेत. वन विभाग, तहसील विभाग तसेच कृषी अधिकारी कार्यालयाकडे शेतकर्यांकडून लेखी तक्रारी करूनदेखील संबंधित प्रशासनाकडून याबाबत योग्य त्या उपाययोजना होताना दिसत नसल्याचे, खारपाटील यांनी सांगितले. त्यामुळे येथील शेतकर्यांवर नुकसानीचे मोठे संकट कोसळले आहे.