। मुंबई । प्रतिनिधी ।
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संतोष देशमुख यांच्यासोबत झालेल्या क्रौर्याच्या दाव्यांवर बोलताना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे काही घडले नव्हते असे वक्तव्य विधानसभेत केले होते. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना फटकारले आहे. फडणवीस खोटं बोलत आहेत, धडधडीत पुरावे असतानाही ते खोटे बोलत असतील तर त्यांची गृहमंत्रीपदावर काम करायची मानसिकता नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, फडणवीस खोटं बोलत आहेत. त्यांना चुकीचं ब्रिफींग झालेले नाही. हे सर्व फोटो, व्हिडीओ त्या क्षणी फडणवीस, अजित पवार, पोलीस अधिकार्यांनी पाहिलेले आहेत. ते जर असं बोलले आहेत की हे फोटो पाहिलेले नाही तर ते दिशाभूल करत आहेत. हे फोटो व्हिडीओ आमच्यापर्यंत आले. आरोपपत्रात लावलेले आहेत. तर राज्याचे गृहमंत्री कसे काय ते झटकू शकतात. तसेच, धड़घधडीत पुरावे असताना ते जर असे बोलत असतील तर ते त्यांची मानसिकता नाही गृहमंत्रीपदावर काम करायची, अशी टीका राऊत यांनी फडणवीसांवर केली आहे.