| उरण | प्रतिनिधी |
उरण खोपटे येथे 8 फेब्रुवारी 2024 रोजी एनएमएमटी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे भीषण अपघात झाला होता. त्यात निलेश शशिकांत म्हात्रे यांचा निष्पाप प्राण गेला होता. आणि त्याचवेळी केशव आत्माराम ठाकूर हे देखील गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर नवी मुंबई महानगर परिवहन मंडळाने 20 दिवसाच्या आत मयत व जखमी कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे हमीपत्र लिहून दिले होते. त्यानंतर सतत पाठपुरावा, संघर्ष, आंदोलने केली गेली. त्यात निलेश शशिकांत म्हात्रे यांच्या कुटुंबियांना एक वर्षानंतर न्याय मिळाला. परंतु, गंभीररित्या जखमी झालेल्या झालेल्या केशव आत्माराम ठाकूर यांना अद्यापही कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. तरी, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, तसेच त्यांची संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी 28 फेब्रुवारी रोजी जेएनपीटी मल्टीपर्पज सभागृहात झालेल्या आमसभेत महिला सामाजिक कार्यकर्त्या ममता पाटील यांनी केली आहे.