रायगडचा पालकमंत्री आम्ही तिघे ठरवणार

पक्ष प्रवेश सोहळ्यात विरोधकांना अजितदादांचा चिमटा

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निवडीचे राजकारण सुरू असतानाच शनिवारी अलिबागमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केलेल्या विधानाने क्षणभर भुवया उंचावल्या. व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना अजितदादा म्हणाले, रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आम्ही तिघे ठरवणार. दादांचे हे उद्गार ऐकताच सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण व्यासपीठावर स्वतः अजितदादा, खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे हे तिघे जण पाहायला मिळाले. परंतु प्रसंगावधान राखून दादांनी लगेचच आपल्या शैलीत सभागृहात असणाऱ्यांसमोर सारवासारव करीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि स्वतःचे नाव घेत आम्ही तिघे असा उल्लेख केला आणि सभागृहात हशा पिकला.

अलिबाग येथे जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते. सभागृहात उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महायुतीच्या सरकाराच्या धोरणांची माहिती विषद करीत त्यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करीत राहणार असल्याचे उपस्थितांना अश्वस्थ केले. या सोहळ्यात पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अजितदादांनी हळूच विरोधकांना चिमटा काढला. ते करताना कोणाचेही नाव घेतले नाही पण रायगड जिल्ह्याच्या विकासात्मक नियोजनात राज्याच्या तिजोरीतून भरघोस निधी दिला जाईल अशी कबुलीदेखील अजितदादांनी दिली.

विधानसभेचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र ॲड, प्रवीण ठाकूर आणि रवींद्र ठाकूर यांनी काँग्रेसने दिलेला हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे घड्याळ आपल्या हातात बांधले. प्रवीण ठाकूर यांच्या शेकडो समर्थकांनी पक्ष प्रवेशाला आपली उपस्थिती दाखवून माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या सुपुत्रांच्या निर्णयाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अलिबागनगरीत असणाऱ्या हॉरीझॉन सभागृहात पक्ष प्रवेशाचा जाहीर सोहळा आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी साडेचार वाजता सुरू होणारा पक्ष प्रवेशाचा सोहळा तब्बल सव्वातास उशिराने सुरू झाला. पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना ताटकळत बसावे लागले होते.

यावेळी व्यासपीठावर रायगडाचे खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, अशोक भोपतराव, ॲड. राजीव साबळे, उमा मुंढे, मंगेश दांडेकर, मनोज भगत, कृषिकांत भगत, आशिष भट, जयेंद्र भगत, अमित नाईक, चारुहास मगर, मधुकर पाटील, हर्षल पाटील, सुभाष केकाणे, मनोज शिर्के, आरती मोकल, मेघना भोईर, फिरोज घलटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याच्या राजकारणातील राजकीय परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. आशा परिस्थितीमध्ये जनतेच्या विकासासाठी भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. शब्दाचा पक्का आहे. गेलेली वेळ परत येत नाही मिळालेल्या वेळेतच कामांची पूर्तता व्हायला हवी. राष्ट्रवादी जातीचा नाही तर समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करतो. आम्ही बेरजेचे राजकारण करतो. कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नसते जनतेचा विश्वास जिंकायचा असतो. लहान चूक राज्यकर्त्यांना भारी पडल्याचा इतिहास या देशाने अनुभवला आहे. असे अजितदादा पवार म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गाला कोणती साडेसाती लागली आहे. हेच समजत नाही. कंत्राटदार भेटतात परंतु महामार्ग अद्यापही झालेला नाही. हा महामार्ग अधिक चांगल्या पद्धतीने निर्माण करण्यासाठीची जबाबदारी सरकारकडून स्वीकारली जाणार आहे. मी कडक आहे हे निश्चित सत्य आहे. कारण नसताना कोणालाही अंगावर घेत नाही आमच्या अंगावर आल्यास आम्ही त्यांना सोडत नाही. कायद्याच्या चाकोरीत राहून त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही नेहमीच सज्ज राहतो. प्रवीण ठाकूर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी सज्ज रहायला हवे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत सत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.

नेत्यांना बोलाल तर सोडणार नाही: ॲड. प्रवीण ठाकूर
माझ्या वडिलांच्या कार्यामुळे आमची ओळख आहे. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही जनतेचे काम करतोय. माझा कोणताही स्वार्थ नाही, आपली नाळ जनतेबरोबर जोडलेली आहे. अलिबाग पर्यटनस्थळ असतानाही रस्ते आरोग्य, पाणी आदी सुविधांसाठी झटावे लागते आहे. जनतेची जबाबदारी असल्याने त्यांच्या विकासासाठी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आलो आहोत. राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा निर्णय घेण्यास उशीर झाला आहे. शाहू, फुले आंबेडकरांची विचारधारा असणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. आमच्या नेत्यांना कोणी वाईट बोलेल तर गाठ आमच्याशी आहे असा ॲड. प्रवीण ठाकूर यांनी नाव न घेता आमदार महेंद्र दळवी यांना इशारा दिला.
Exit mobile version