आम्ही सुसंस्कृत आहोत, नाव न घेता शिवसेनेच्या आमदारांना टोला
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून महायुतीमधील शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे आमदार युती डावलून आदिती तटकरे यांना निशाण्यावर ठेवत गेल्या दोन दिवसांपासून टिकास्त्र सोडत आहेत. अखेर खासदार सुनील तटकरे मुलीसाठी मैदानात उतरले असून त्यांनी टिका करणार्यांना चोख उत्तरे दिली आहेत. आमदार दळवी, भरत गोगावले आणि थोरवे यांचे नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार घेत आम्ही सुसंस्कृत आहोत, असे बोलून शिवसेनेचे आमदार एक प्रकारे असंस्कृत असल्याचेच त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवून दिले आहे.
पालकमंत्री पद मिळावे, यासाठी शिंदे गटातील आमदार तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी जीवाचा आटापीटा केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पालकमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बाधून आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विद्यमान आमदार दळवी व महेंद्र थोरवे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे व आदिती तटकरे यांच्यावर टिकास्त्र सोडत आहेत. आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळू नये, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे आमदार शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, मागील दोन दिवसांपुर्वी आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळाल्यावर शिवसेनेच्या आमदारांनी विरोध केला. त्यांचे पालकमंत्री पद जावे यासाठी वेगवेगळया पध्दतीने प्रयत्न केले. अखेर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावर स्थगिती घेण्याची वेळ आली. परंतु येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मुख्य ध्वजारोहणाचा मान महिला व बालकल्याण मंत्री आदीती तटकरे यांना मिळणार असल्याची चर्चा जोरात सूरू आहे. त्यामुळे गोगावले यांना पुन्हा गंडवल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
अलिबागमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. वेगवेगळ्या विकास कामांवर चर्चा केल्यानंतर त्यांना पालकमंत्री पदावरून शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यामधील वादाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले, पालकमंत्री पदाच्या वादामुळे वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही सुसंस्कृत आहोत. राजकारणात मनासारखे होईल असे नाही. जनतेने दिलेल्या संधीतून विकासाला गती देण्याचे काम केले आहे. पालकमंत्री पदावरून वेगवेगळे मतभेद असू शकतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावर चर्चा करून प्रश्न सोडवतील असे ते म्हणाले.
आ. दळवींनाकार्यकर्तेच उत्तर देतील
भारतीय जनता पार्टीचे विधानसभा सदस्य दुजाभाव करीत नाहीत. परंतु बाकीच्यांच्या मनात काय असेल, ते काळाच्या ओघात निघून जाईल. विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीने महाडपासून अलिबागपर्यंत काय मदत केली, हे मी आता बोलणार नाही. परंतु योग्य वेळी माझे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील असा टोला सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना लगावला आहे.