भरत गोगावले यांच्यासाठी आशेचा किरण
| रायगड | खास प्रतिनिधी |
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. त्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना निवडण्यात आले होते. त्यामुळे, मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध आणि आंदोलन केले. याची दखल घेत राज्य सरकारने रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे, अदिती तटकरे यांचा पत्ता कट झाला आहे. लवकरच भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी निवड होणार असून प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन तेच करतील, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला ही स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे, महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.