। पेण । वार्ताहर ।
दारी उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे जसे प्रतीक आहे, तसेच समाजातील वंचित महिलांनी सार्वजनिकरित्या उभारलेली गुढीही परिवर्तनाची आणि रचनात्मक संघर्षाची नांदी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले आहे. अंकुर ट्रस्ट आणि महिला अत्याचार विरोधी मंचाच्यावतीने आयोजित ‘स्त्री अस्मितेची व संविधानाची गुढी उभारणी’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
दरवर्षीप्रमाणे, पेण शहरातील कष्टकरी महिला आणि सामाजिक बांधिलकी जपणार्या शिक्षित महिलांनी महात्मा गांधी वाचनालयाच्या प्रांगणात गुढी उभारणी करतात. हा उपक्रम केवळ उत्सव नसून स्त्री अस्मितेचे प्रतीक बनत चळवळीच्या रूपात विकसित झाला आहे. पेण शहर हे गणपती मूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध असले तरी त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींसाठीही ओळखले जाते. यंदाच्या वर्षी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणींनी संविधान जागृती अभियान राबवण्याची घोषणा केली. तसेच, सार्वजनिक ठिकाणी होणार्या लैंगिक हिंसाचाराच्या अनुषंगाने ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीपासून वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकीत महिलांनी आत्मसन्मान देणारे घोषवाक्य असलेले फलक हातात घेतले होते. या मिरवणुकीचा समारोप महात्मा गांधी वाचनालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी ‘अपराजिता’ स्पेशल महिला भारती पवार, मानसी बापट, रजनी गायकवाड, गौरी कातकरी, वंदना वाघमारे आणि महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी गुढी उभारणी केली.
कार्यक्रमात आई डे केअर, चाईल्ड हेवन, अंकुर ट्रस्टच्या मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत गुढीला मानवंदना दिली. इनरव्हील क्लबच्या सदस्यांसह विविध राजकीय पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांनीही आपली उपस्थिती लावली. स्त्री शक्तीचा जागर घडवणारा हा उपक्रम केवळ गुढीपाडव्याच्या उत्सवापुरता मर्यादित नसून, महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण चळवळ ठरत आहे.