दिव्यांग सहाय्य पोर्टल मार्गदर्शन शिबीर

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या दिव्यांग मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘दिव्यांग सहाय्य पोर्टल’ संदर्भात श्रीवर्धन येथे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. एकता दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या पुढाकाराने सोमवारी (दि.6) पर्यटक निवास संकुलातील ‌‘दिव्यांग कक्ष‌’ येथे हे शिबीर यशस्वीरित्या पार पडले.

या शिबिरामध्ये दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, शासनाने प्रथमच 21 प्रकारच्या दिव्यांगत्वांसाठी असलेल्या सर्व योजनांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणल्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपस्थितांना पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची माहिती, अर्ज कसा भरावा, तसेच अर्जाची स्थिती ऑनलाइन कशी तपासावी, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, ‘दिव्यांग सहाय्य पोर्टल ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, यामुळे दिव्यांगांना विविध कार्यालयांच्या फेऱ्यांपासून आणि कागदपत्रांच्या गुंतागुंतीतून मुक्ती मिळणार आहे. घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे.’

या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील दिव्यांगांपर्यंत शासकीय योजना पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. तर भविष्यात अशा प्रकारची आणखी शिबिरे आयोजित करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

Exit mobile version