विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे धडे

कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचा उपक्रम

| नेरळ | प्रतिनिधी |

दहिवली येथील स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतनमध्ये कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर जनजागृती मोहिमेअंतर्गत मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी, ऑनलाइन फसवणूक आणि मोबाईलचा सुरक्षित वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

डोंबे विद्यानिकेतन शाळा येथील सकाळच्या सत्रात शिक्षण घेणाऱ्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांच्याकडून सायबर जनजागृती अभियान राबवण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्याबद्दल माहिती देण्यासाठी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अजय शिर्के, महेश क्षीरसागर, हनुमान सालगुडे, कर्जत पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल घवस व शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा कडू आणि माया म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते. ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब कुरुंद यांनी मार्गदर्शन केले. मोबाईलवरील फसव्या जाहिराती, अनोळखी लिंक उघडल्यामुळे होणारे संभाव्य नुकसान आणि ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार त्यांनी उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.मोबाईलचा वापर किती आणि कशा
पद्धतीने करावा, इंटरनेट वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, तसेच वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देणे का टाळावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना विविध हेल्पलाइन क्रमांकांची माहितीही देण्यात आली. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असताना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच सायबर सुरक्षेचे महत्त्व समजावे आणि त्यांनी इंटरनेटचा जबाबदारीने वापर करावा, या उद्देशाने या शिबिराला महत्त्व प्राप्त झाले आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, ऑनलाइन फसवणुकीचे धोके आणि डिजिटल सुरक्षिततेसाठी घ्यावयाची खबरदारी यांची माहिती मिळाली.

यावेळी शिक्षक किरण पालवे, राजू शिंदे, किशोर दिघे, विनायक अहिरे, चंद्रकांत शिंगोळे, शिल्पा जाधव, रेश्मा हिंदोळे, जागृती आणणे, वैजू ससे, स्नेहल जोशी, सोनम शिंदे, योगेश लाड, विजय सोनवणे आदी तसेच पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version