। उरण । वार्ताहर ।
भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 तसेच भारतीय साक्ष अधिनियम 2023 या नवीन कायद्याची माहिती जनसामान्यांना व अंमलबजावणी यंत्रणेला कायद्याची ओळख करून देण्यासाठी पोलीस आयुक्तालय स्तरावर कार्यशाळेचे आयोजन भोईर गार्डन, उरण कोट नाका येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेत उरण तालुक्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापक, शाळेचे प्रतिनिधी यांना बोलविण्यात आले होते.
या कार्यशाळेत उरण न्यायालयाचे सरकारी वकिल प्रदिप देशमाने यांनी नवीन कायद्यात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या विषयीच्या कायद्यात कोणते बदल झाले आहेत. याची माहिती दिली आणि शिक्षकांनी कोणती काळजी घ्यावी व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, याबाबत मार्गदर्शन केले. न्हावा शेवा सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल यांनीदेखील या नव्या कायद्यांबाबत माहिती दिली. उरणचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र मिसाळ यांनी सायबर गुन्हे याबाबत नागरिकांची कशी फसवणूक होते आणि ते टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे, याची माहिती दिली. उरण पंचायत विभागाच्या गटशिक्षण अधिकारी प्रियंका पाटील यांनी सर्व शाळेत सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शाळेत शौचालयांची स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, अशाप्रकारे मार्गदर्शन केले.