। आगरदांडा । प्रतिनिधी ।
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड जंजिरा, वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय उरण, कला आणि वाणिज्य महाविद्यालय खारेपटण आणि अंजुमन इस्लाम जंजिरा वाणिज्य महाविद्यालय श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसायातील उदयोन्मुख ट्रेंड आणि व्यवस्थापन यावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या राष्ट्रीय ई-चर्चासत्राचे उद्दिष्ट शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि उद्योग व्यावसायिकांना वाणिज्य आणि व्यवस्थापनातील त्यांचे संशोधन निष्कर्ष आणि अंतर्दृष्टी देवाणघेवाण करणे. तसेच या चर्चासत्रात व्यवसाय धोरणे, आर्थिक व्यवस्थापन, विपणन, डिजिटल परिवर्तन, उद्योजकता आणि संघटनात्मक विकास यासारख्या क्षेत्रातील उदयोन्मुख ट्रेंड, आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यात आली.
या चर्चासत्राचे आयोजन प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख, प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर, प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे आणि प्रभारी प्राचार्य डॉ. दानिश संगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. साजिद शेख आणि डॉ. आमोद ठक्कर यांनी सादर केली. राष्ट्रीय चर्चासत्राची सुरुवात मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संगीता पवार यांच्या व्याख्यानाने झाली. या सत्राचे अध्यक्ष स्थान डॉ. प्रेम भगवान आचार्य यांनी भूषवले आणि आभार प्रदर्शन प्रा. वसीम सय्यद यांनी केले. या चर्चासत्राचे पहिले निमंत्रित व्याख्यान अबिदा इनामदार महाविद्यालयाचे डॉ. मुल्ला महंमदीनुष यांनी केले. या सत्राचे अध्यक्ष स्थान डॉ. के एच सानप यांनी भूषवले आणि आभार प्रदर्शन डॉ. दानिश संगे यांनी केले. या चर्चासत्राचे दुसरे निमंत्रित व्याख्यान गुवाहाटी वाणिज्य महाविद्यालय आसामचे डॉ. गोर गोपाल बानिक यांनी केले, या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. आमोद ठक्कर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. गुरमीत वाधवा यांनी केले.
या चर्चासत्रामध्ये 100 हून अधिक संशोधकांनी सहभाग घेतला आणि 50 शोधनिबंध सादरीकरण व संकलित करण्यात आले. सादरीकरणाचे परिक्षण डॉ. धीरज ओव्हाळ, डॉ. प्रेम आचार्य, डॉ. तृप्ती थोरात आणि डॉ. दिवाकर कदम यानी केले. या परिषदेच्या आयोजनासाठी प्रा. भूषण ठाकूर, प्रा. अल्ताफ फकीर, प्रा. मधीहा रज्जब, प्रा. डॉ. गुरमीत वाधवा, प्रा.वसीम सय्यद, प्रा. निखत राजपुरकर आणि चारही महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.