| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही पनवेल शहरासह तालुक्यात, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा परिसरात अनेक ठिकाणी गुटख्याची जास्त दराने खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे विराजमान झाल्यापासून अनेक ठिकाणी सहजपणे उपलब्ध होत असलेला गुटखा काही ठिकाणी बंद झाला. पोलिसांकडून वेळोवेळी छापेमारी करून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला जात असला, तरी काही दिवसांतच पुन्हा विक्री सुरू होत असल्याने प्रशासनाच्या कारवाईच्या परिणाम कारकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, कारवाई थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील काही पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि इतर ठिकाणी गुटखा सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. विशेष म्हणजे भांगेच्या गोळ्या, इलेक्ट्रिक सिगारेट आणि इतर अमली पदार्थ देखील टपऱ्यांवर सहज उपलब्ध होत असल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन युवकांपर्यंतही या पदार्थांची सहज पोहोच होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.
अन्न, औषध प्रशासन आणि पोलीस यांनी याविरोधात वारंवार कारवाई करणे गरजेचे आहे, मात्र एखाद दुसरी कारवाई वगळता त्यांच्याकडून पुन्हा कारवाई केली जात नाही. गुटखा विक्री थांबत नसल्याने या अवैध व्यवसायामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.







