श्रीवर्धनमध्ये गुटखा विक्री तेजीत

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

खाद्यपदार्थांच्या नावाने होतेय विक्री

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

राज्य सरकारने गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्री, प्रदर्शन, उत्पादन आणि वितरणावर बंदी घातली आहे. श्रीवर्धन तालुक्यात गुटखाबंदी ही फक्त नावापुरतीच राहिली असून, तालुक्यातील निवडक तंबाखू दुकाने व पान टपऱ्यांवर सर्रास बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री तेजीत सुरू आहे. म्हसळा येथील एक व्यापारी श्रीवर्धन तालुक्यातील काही वितरकांना हाताशी घेत गुटखा विक्री करतोय, अशी जोरदार चर्चा आहे.

गुटखा व्यापारी तसेच गुटखा वितरक हे पाकिटे रात्री-अपरात्री ठराविक तंबाखू दुकाने व पान टपऱ्यांवर वितरण करतात. यावेळी बिस्कीट खोके व धान्यांच्या पोत्यातून पाकिटे नेत असल्याने नागरिकांना संशय येत नाही. गुटखा विक्रेते व ग्राहक ही लाडू, चिक्की या खाद्यपदार्थांच्या नावाचा वापर करीत गुटखा पाकिटाची देवाणघेवाण करतात. यावेळी कागदात गुंडाळून हे व्यवहार होत असल्याने समोरच्या इतर ग्राहकांना आपल्या समोर बंदी असणाऱ्या गुटख्याची विक्री होत आहे याची कल्पना येत नाही. विशेष म्हणजे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही. यामुळे वितरण व विक्रेत्यांचे फोफावले आहे.
महाराष्ट्रातील गुटखा बंदी कायदा केवळ कागदावरच राहिला आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे कठोर कारवाई करण्याची गरज आहे. नियमित धाडी टाकून गुटखा वितरक व विक्रेत्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे, असे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.

साधारण 2022 साली स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून श्रीवर्धन येथील टपऱ्यांवर धाड टाकण्यात आली होती. यावेळेस साडेचार हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. तालुक्यात इतर ठिकाणी धाड टाकण्यात आली; परंतु टपरी चालकांना अगोदरच धाडीची खबऱ्याकडून टीप मिळाल्याने गुटखा विक्रेत्यांनी सुरक्षित ठिकाणी गुटखा ठेवला. यामुळे पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या हाती काहीच लागले नाही.

संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी दोन क्षेत्रीय अधिकारी कार्यरत आहेत. नवीन भरती सुरू आहे. त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे. परंतु, अवैध गुटखा विक्रीबाबतीत लवकरच कारवाई करण्यात येईल.

मारूती घोसाळवाड,
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पेण

Exit mobile version