पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष; विधानसभेतही जोरदार चर्चा
| रेवदंडा | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात गुटखाबंदी असूनही राज्यभरात खुलेआम गुटख्याची विक्री सुरू आहे. भाजपचेच विधानपरिषदेतील आमदार श्रीकांत भारतीय यांनी यावर संताप व्यक्त करत थेट महायुती सरकारचेच वाभाडे काढले आहेत. “राज्यात गुटखाबंदी आहे हे विधानच आता हास्यास्पद वाटतं,” असा टोला लगावत त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची जोरदार मागणी केली आहे. आमदार भारतीय यांच्या टीकेनंतर आता अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील गुटखा व्यवहार पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून रेवदंड्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असून, मात्र पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी कबूल केले की, गेल्या एका महिन्यात 53 ठिकाणी छापे टाकून तब्बल 3 कोटींहून अधिक किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही आकडेवारीच स्पष्ट दाखवते की गुटखाबंदी केवळ कागदावरच आहे. गुटख्यामुळे राज्यातील तरुण पिढीचे आरोग्य आणि भविष्य दोन्ही धोक्यात आले आहे. तरीही पोलीस व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घ्यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी,“ अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गुटखा विक्रीस अक्षम्य अपराध ठरवत, शिक्षेत वाढ करण्याची मागणीही श्रीकांत भारतीय यांनी अधोरेखित केली आहे. आता पाहावे लागेल की भाजपच्या आमदाराच्या घरच्या आहेरानंतर सरकार आणि पोलीस प्रशासन जागं होतं का?
पारनाका परिसरात गोडाऊन?
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गुजरातहून दर दोन दिवसांनी गुटख्याचा माल रेवदंड्यात पोहोचतो. पारनाका परिसरात खास गोडाऊन असून, तिथून गुटखा साठवून संपूर्ण कोकणात पुरवठा केला जातो, अशी चर्चा आहे. या सगळ्या व्यवहारात दिवसाला लाखोंचा उलाढाल होत असून, रेवदंडा हे गुटखा वितरणाचे केंद्रबिंदू बनले आहे, अशी लोकांमध्ये चर्चा आहे.
गुटखा माफियांशी संगनमत?
जनतेकडून तक्रारी देऊनही रेवदंडा पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केलं आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणा गुटखामाफियांशी संगनमताने काम करत आहेत का? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
एसपी साहेब, लक्ष द्या!
अवैध धंद्यांच्या बाबतीत रेवदंडा सातत्याने बदनाम होत आहे. महिनाभरापूर्वींच लाखोंचा गांजा पोलिसांनी कारवाई करीत जप्त केला. समुद्रकिनारी बेकायदा वाळूउत्खनन, डिझेल-रॉकेल तस्करी आदी अवैध धंद्यांमुळे रेवदंडा बदनाम होत आहे. याबाबत रेवदंडा पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या कार्यवाहीबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत. तरी, अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या गंभीर बाबीत लक्ष घालावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
