लाखोंचा गुटखा जप्त

गणेश घाटात कार सोडून चालक फरार

| कर्जत | प्रतिनिधी |

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पोलीस नाकाबंदीतून पळ काढण्याच्या प्रयत्नात गुटखा तस्करीचा प्रकार उघड झाला आहे. कर्जत पोलिसांचा पाठलाग सुरू होताच चालकाने गणेश घाट रस्त्यावर महिंद्रा एक्सयूव्ही 500 सोडून पलायन केले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यात 2 लाख 80 हजार 850 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आला. चार लाखांचे वाहन आणि गुटखा असा एकूण 6 लाख 80 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिवाळीत चोरी, घरफोडी आणि गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी कर्जत पोलिसांकडून दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी दोन तास विशेष नाकाबंदी केली जात आहे. चारफाटा येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी वाहनांची तपासणी करीत असताना कर्जतच्या दिशेने आलेल्या सिल्व्हर रंगाच्या एक्सयूव्ही 500 चालकाने पोलिसांना पाहताच वेग वाढवून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यानंतर रेल्वे पुलावरून पुढे जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील गणेश घाट रस्त्यावर चालकाने वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात सेंटेड बीक टोबॅको कंपनीचा आणि विमल गुटखा आढळला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुढील कारवाई करण्यात आली.

दरम्यान, वाहनाच्या क्रमांकाची ऑनलाइन तपासणी केली असता मालकीबाबत संशय निर्माण झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार वाहन हबीबूर रहमान कादरी यांच्या नावावर असल्याचे दिसत असले तरी क्रमांक खरा की बनावट आणि वाहनाचा सध्याचा मालक कोण, याची खातरजमा झालेली नाही. यासाठी आरटीओकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जुनी वाहने खरेदी-विक्री केल्यानंतर मालकी हस्तांतरित न झाल्यास त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असते, असे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले. फरार चालकाचा शोध घेण्याबरोबरच गुटखा कुठून आणला जात होता, त्याची विक्री कुठे होणार होती आणि या वाहतुकीमागे कोणाचे जाळे आहे, याचा तपास कर्जत पोलीस करीत आहेत.

Exit mobile version