खालापुरात रंगला हळदीकुंकवाचा सोहळा; हजारो महिलांनी लुटले वाण

| खालापूर | विशेष प्रतिनिधी |

आकर्षक रोषणाई, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आणि एकापेक्षा एक सरस अशा ठेका धरायला लावणार्‍या लावण्यांचे सादरीकरण यामुळे महिलांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. निमित्त होते कृषीवल परिवार आणि शेकाप महिला आघाडी आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमाचे. खालापूरनगरीत हा सोहळा शनिवारी मोठ्या उत्साही वातावरणात हजारो महिलांच्या साक्षीने पार पडला. या सोहळ्यास सोनी टीव्हीवरील कलाकारांनी हजेरी लावली होती. या कलाकारांना पाहण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती.


शेकाप महिला आघाडीप्रमुख, कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने अलिबागबरोबरच जिल्ह्यात विविध ठिकाणी हळदीकुंकू सोहळा आयोजित करुन महिलांचा यथोचित सन्मान केला जात आहे. अलिबाग आणि पालीमध्ये दिमाखात पार पडलेल्या हळदीकुंकू सोहळ्यानंतर शनिवारी खालापूर फाटा श्री कृष्ण पेट्रोलपंपाजवळ हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.


यावेळी ‘जिवाची होतिया काहीली’ मालिकेतील श्रुतकीर्ती सावंत, आशीर्वाद तुझा एकविरा आई फेम अमृता पवार यांच्यासह संजना हिंदूपूर, शोभा डांगे, पायल मेमाने, अमोल बावडेकर, निशाद भोईर, सोनाली पवार आदी कलाकार उपस्थित होते.



ठसकेबाज लावणीवर ठेका
सोनाली पवारने एकापेक्षा एक सरस लावणी सादर करीत हळदीकुंकू महोत्सवात रंगत आणली. बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी, ठसका आणि व्यासपीठावर चैतन्य निर्माण करणार्‍या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजनाची सीमाच गाठली. त्यामुळे ढोलकीच्या तालावर अन् घुंगारांच्या बोलावर उपस्थित महिलाही थिरकल्याचे पाहायला मिळाले.

Exit mobile version