वाघ्रणवाडतील हातभट्टी उद्ध्वस्त

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारल्यापासून गावठी दारुविरोधी मोहिम हाती घेतलेले पोलीस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (दि.26) एक मोठी कारवाई केली. या कारवाईत नागोठण्याजवळील वाघ्रणवाडी आदिवासी वाडीच्या उत्तरेकडील जंगल परिसरातील एक मोठी हातभट्टी उद्ध्वस्त करुन सुमारे 1600 लिटर गुळमिश्रित रसायनही नष्ट केले आहे.
नागोठणे पोलिसांनी धाड टाकलेल्या गावठी दारु निर्मितीच्या हातभट्टीच्या ठिकाणी 2 प्लास्टिक सिंटेक्सच्या टाक्यांपैकी 700 लिटरची एक टाकी व 500 लिटरची दुसरी टाकी तसेच 2 प्लास्टिकच्या बॅरलमध्ये प्रत्येकी 200 लिटर असे एकूण 1600 लिटर गुळमिश्रित रसायन सापडले. या गुळमिश्रित रसायनाची किंमत 40 रुपये प्रति लिटर दराने 64 हजार रुपये असल्याची माहिती पो.नि. तानाजी नारनवर यांनी दिली. सापडलेला मुद्देमाल हा वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने सदरचा मुद्देमाल हा जागीच नष्ट करून पेटवून देण्यात आला आहे. पो.नि. तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार पो.ह.राजेश जगताप, पो.ना. सचिन भोईर, पो.ना. गंगाराम दुमने, महिला पो.शि. सारिका युवराज मात्रे यांच्या पथकाने ही महत्वपूर्ण कारवाई केली.

Exit mobile version