माथेरानमधील हातरिक्षाचालक ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमधील हातरिक्षाचालकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अधिकृत 94 हातरिक्षाचालकांपैकी केवळ 32 जणांना ई-रिक्षा उपलब्ध झाली असून, तब्बल 62 हातरिक्षाचालक अद्याप ई-रिक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हातरिक्षा बंद करून चालकांचे पुनर्वसन करण्याची मागणी असतानाही सर्व चालकांना ई-रिक्षा मिळत नसल्याने श्रमिक रिक्षा संघटनेने नाराजी व्यक्त केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून हातरिक्षांद्वारे प्रवासी वाहतूक केली जात होती. हातरिक्षा ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी 2012 पासून न्यायालयीन लढा सुरू झाला. त्यानंतर 2022 मध्ये पर्यावरणपूरक आणि प्रदूषणविरहित ई-रिक्षांना परवानगी देण्यात आली. सध्या 20 चालकांना स्वतः ई-रिक्षा घेण्याची परवानगी मिळाली आहे, तर माथेरान नगरपरिषदेच्या सहा ई-रिक्षा 12 चालकांना देण्यात आल्या आहेत.

माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या मोठी असल्याने प्रवाशांना सुरळीत आणि वेळेवर वाहतूक सुविधा मिळावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हातरिक्षाचालकांचे संपूर्ण पुनर्वसन आणि ई-रिक्षा सेवेचे योग्य नियोजन या दोन्ही प्रश्नांवर माथेरान नगरपरिषद आणि प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

62 चालकांचे पुनर्वसन कधी?
माथेरान नगरपरिषदेने सर्व 94 हातरिक्षाचालकांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा मिळाव्यात, असा ठराव केला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याबाबत पुढील निर्णय होत नसल्याने उर्वरित चालकांमध्ये नाराजी आहे. हातरिक्षा बंद करून चालकांचे पुनर्वसन करायचे असेल तर सर्व चालकांच्या हातात ई-रिक्षा देणे आवश्यक आहे, अशी मागणी श्रमिक रिक्षा संघटनेने केली आहे. दरम्यान, नगरपरिषदेच्या ई-रिक्षा मिळालेल्या 12 चालकांनाही अनेक बंधनांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येते. त्यांनाही स्वतःची ई-रिक्षा मिळावी, अशी मागणी आहे.
ई-रिक्षा सेवेतही मनमानीचा आरोप
माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर प्रवासी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना काही वेळा वेळेवर सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही चालक मनमानी पद्धतीने सेवा बंद ठेवत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच रुग्णसेवेसाठी ई-रिक्षांचा वापर होत असल्याने प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
Exit mobile version