| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील खांडपे गावात गेल्या वर्षभरापासून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडे लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
खांडपे गावात कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या मोटारीही व्यवस्थित सुरू होत नसल्याने गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील वीज वाहक तारा जुन्या झाल्या आहेत. खांडपे गावात सध्या फक्त 160 ते 180 व्होल्ट इतकाच वीज दाब मिळत असल्याने घरातील बल्ब, पंखे, फ्रीज तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अनेक उपकरणे बंद पडण्याच्या स्थितीत असून, आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत महावितरण विभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती व सुधारणा कराव्यात, अशी मागणी केली आहे.






