। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील दासगाव मोहल्ला येथील 25 वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची तक्रार पीडित महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यात केली आहे. अमरिन सुफियान बळी हिचे तासगावमधील सुफियान सुजामुद्दीन बळी याच्याशी 2019 मध्ये रीतीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्नामध्ये पतीसह सासरच्या मंडळींनी दहा लाख रुपये हुंडा व मोटरसायकल, फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादी वस्तू मुलीच्या वडिलांकडे मागितल्या होत्या.
लग्नानंतर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने माहेरच्यांना मागणी पूर्ण करणे शक्य झाले नाही. त्यामुळे पतीसह सासू-सासरा, नणंदेने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. अखेर जाचाला कंटाळून विवाहित महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यात पती सुफियान बळी, सासरा सुजामुद्दीन दाऊद बळी, सासू हसमत बळी (रा.दासगाव), नणंद समीना इम्रान ताज (रा.देशमुख मोहल्ला, महाड), सिमिन असिफ गैबी (रा.मोरबा) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.पी. खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एच.जी. लांगे करीत आहेत