| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी बुधवारी (दि.2) रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नागाव समुद्रकिनाऱ्याच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रमांची माहिती दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांचे मौल्यवान मार्गदर्शन मागितले.
नागाव समुद्रकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळवून देणे, शून्य कचरा व्यवस्थापन, हरित पर्यटनाला चालना, स्थानिक समुदायाच्या सहभागातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवणे, यासारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘स्वच्छ, हिरवे आणि शाश्वत भविष्य’ या संकल्पनेभोवती केंद्रित असलेल्या या योजनेला जिल्हास्तरीय पाठबळ मिळावे, हा या भेटीमागचा प्रमुख उद्देश असल्याचे हर्षदा मयेकर यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नागाव ग्रामपंचायतीच्या नवकल्पनाशील उपक्रमांची माहिती दिली आणि ग्रामस्थांच्या सहभागातून होत असलेल्या सकारात्मक बदलाची जाणीव करून दिली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही या उपक्रमांचे कौतुक करत आवश्यक सहकार्याची ग्वाही दिली.